एखादी गोष्ट सातत्याने करत राहिल्यास, कालांतराने त्यात चांगलं कौशल्य मिळवता येतं. बचतीच्या बाबतीतही हे तितकंच खरं आहे. तुम्ही नियमितपणे बचत करत राहिलात, तर हळूहळू मोठी रक्कम जमा होऊ शकते. विशेष म्हणजे, या रकमेवर मिळणारं व्याजही पुढे आणखी व्याज मिळवून देऊ शकतं. यामागे एक महत्त्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे चक्रवाढ व्याज.
चक्रवाढ व्याज म्हटलं की, अनेकांना धडकी भरते; पण ती समजून घेणं अगदी सोपं आहे. योग्य वेळी बचतीची सुरुवात करून त्यात सातत्य ठेवलं, तर चक्रवाढ व्याजाच्या मदतीने भविष्यात तुमची बचत वाढण्यास मदत होऊ शकते.
सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर आपल्या मूळ रकमेवर मिळणारं व्याज आणि त्या व्याजावर पुन्हा मिळणारं व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. हे आपण उदाहरणातून समजून घेऊया. समजा, तुम्ही एका खात्यात ₹10,000 जमा केले आणि त्यावर दरवर्षी 5% व्याज मिळतं.
पहिल्या वर्षाअखेरीस तुम्हाला ₹500 व्याज मिळेल. त्यामुळे तुमची एकूण रक्कम ₹10,500 होईल. दुसऱ्या वर्षी व्याज फक्त मूळ ₹10,000 रकमेवर न मिळता, ₹10,500 या संपूर्ण रकमेवर मोजलं जाईल. त्यामुळे तुम्हाला ₹525 व्याज मिळेल आणि एकूण रक्कम ₹11,025 होईल. म्हणजेच, आधी मिळालेलं व्याजही पुढे व्याज मिळवून देतं. यालाच चक्रवाढ व्याजाची ताकद म्हणतात.
साध्या व्याजामध्ये मूळ रकमेवर व्याज काढल्या जाते. मात्र, चक्रवाढ व्याजामध्ये मूळ रक्कम आणि आधी जमा झालेलं व्याज या दोन्हींवर व्याज मिळतं. उदाहरणार्थ, ₹10,000 रक्कम 10 वर्षांसाठी दरवर्षी 5% दराने ठेवल्यास, साध्या व्याजाची 10 वर्षांनंतर एकूण रक्कम ₹15,000 होईल. तेच, चक्रवाढ व्याजाची दरवर्षीची मोजणी केल्यास एकूण रक्कम अंदाजे ₹16,289 होईल. म्हणजेच, त्याच व्याजदराने आणि त्याच कालावधीत चक्रवाढ व्याजामुळे अंदाजे ₹1,289 अधिक मिळू शकतात. हे उदाहरण निश्चित व्याजदर गृहीत धरून दिलं आहे.
चक्रवाढ व्याजाचा सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी वेळ महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमची रक्कम जितका जास्त काळ गुंतवलेली राहील, तितकी तिला वाढण्याची अधिक संधी मिळेल. समजा, दोन व्यक्तींना भविष्यासाठी बचत करायची आहे. त्यापैकी एक व्यक्ती लवकर बचत सुरू करते, तर दुसरी काही वर्षांनी सुरुवात करते. दोघांनी समान रक्कम नियमितपणे बाजूला ठेवली, तरी लवकर सुरुवात करणाऱ्या व्यक्तीला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळण्यासाठी अधिक वेळ मिळतो. यासाठी सुरुवातीलाच मोठी रक्कम असण्याची गरज नाही. आपल्या क्षमतेनुसार बचत सुरू करणं, त्यात सातत्य ठेवणं आणि पैशांना वाढण्यासाठी पुरेसा वेळ देणं महत्त्वाचं आहे.
चक्रवाढ व्याजाचा फायदा घेण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. बचतीची सुरुवात लवकर करा. छोटी रक्कम असली, तरी लवकर सुरुवात केल्यामुळे तिला वाढण्यासाठी अधिक वेळ मिळतो. शिवाय, बचतीत सातत्य असणंही गरजेचं आहे. यामुळे भविष्यात मोठी रक्कम जमा करण्यास मदत होऊ शकते. पण, गुंतवणूक केल्यानंतर संयम ठेवणंही गरजेचा आहे. आपण जर वारंवार त्यातून पैसे काढत राहिल्यास पाहिजे तो लाभ घेता येणार नाही. याशिवाय, बचत किंवा गुंतवणुकीचा पर्याय निवडताना व्याजदर, व्याज किती वेळा जमा होतं, शुल्क आणि पैसे काढण्याच्या अटी यांची माहिती घेणंही आवश्यक आहे.
चक्रवाढ व्याज आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं, ती म्हणजे पैशांची वाढ होण्यासाठी नेहमी मोठ्या रकमेपासून सुरुवात करण्याची गरज नसते. योग्य नियोजन, नियमित बचत आणि संयम यामुळे कालांतराने चांगली आर्थिक तरतूद करता येऊ शकते. म्हणूनच, बचतीची सुरुवात आजच करा आणि तुमच्या पैशांना पुरेसा वेळ द्या..