दर महिन्याला चांगली कमाई करूनही महिनाअखेरीस बँक खात्यात पैसा उरत नाही? खरं तर, श्रीमंत होण्यासाठी जास्त कमाई करणं पुरेसं नाही; तर कमावलेला पैसा योग्य पद्धतीने मॅनेज करणे, बचत करणे आणि गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.
जर तुमची बचत होत नसेल आणि महिन्याच्या शेवटी पैसे संपत असतील, तर या 6 सोप्या आर्थिक सवयी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या सवयी अंगीकारल्यास तुमची आर्थिक सुरक्षितता मजबूत होण्यासोबत दीर्घकाळात मोठा पैसा उभारण्यास मदत होऊ शकते.
आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. जसे की, अचानक नोकरी जाणं, आरोग्याशी संबंधित एखादी अडचणं येणं किंवा अचानक गाडीचं काम निघणं.. अशा वेळी इमर्जन्सी फंड हा तुमचा सर्वांत मोठा आधार ठरतो. त्यामुळे किमान 3 ते 6 महिन्यांच्या आवश्यक खर्चाइतकी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवावी. ही रक्कम बचत खाते किंवा सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या गुंतवणूक पर्यायात ठेवावी, जेणेकरून गरज पडल्यास ती त्वरित वापरता येईल.
बहुतेक जण महिनाभर खर्च केल्यानंतर उरलेले पैसे बचत करण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी काहीच उरत नाही. त्याऐवजी पगार जमा होताच ठरावीक रक्कम बचत किंवा म्युच्युअल फंड SIP साठी आपोआप जमा करण्याची व्यवस्था करा. त्यामुळे पगार खात्यात जमा होताच ठरलेली रक्कम आपोआप बचत होईल आणि अनावश्यक खर्चासाठी उपलब्ध रक्कमही कमी राहील.
छोट्या-छोट्या खरेदी आणि अनावश्यक खर्चामुळे अनेकदा महिन्याचे बजेट बिघडते. त्यामुळे बजेटिंग अॅप, एक्सेल शीट किंवा साध्या डायरीमध्ये दररोज होणाऱ्या छोट्या-मोठ्या खर्चाची नोंद करा. यामुळे तुमचा पैसा नेमका कुठे खर्च होत आहे, हे स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, गरज नसलेली सबस्क्रिप्शन किंवा अनावश्यक ऑनलाइन शॉपिंग यांसारखे खर्च कमी करता येतील.
क्रेडिट कार्ड हे उपयुक्त आर्थिक साधन आहे; मात्र त्याचा चुकीचा वापर तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकतो. त्यामुळे तुम्ही समर्थ आहात अशाच ठिकाणी गरजेनुसार त्याचा वापर करा. नेहमी क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल देय तारखेपूर्वी भरा. यामुळे मोठे व्याज आणि दंड टाळता येईल तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यास मदत होईल.
तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तितका चक्रवाढीचा फायदा अधिक मिळू शकतो. सुरुवातीला कमी खर्चाचे इंडेक्स फंड किंवा इक्विटी म्युच्युअल फंड यासारखे पर्याय विचारात घेता येतात. मात्र, गुंतवणुकीचा पर्याय निवडताना तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे.
तुमची सर्वांत मोठी संपत्ती म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा केल्याने तुमची कमाईची क्षमता वाढू शकते. नवीन सर्टिफिकेट कोर्स, प्रशिक्षण किंवा कार्यशाळांच्या माध्यमातून स्वतःची कौशल्ये विकसित करा. यामुळे तुम्हाला चांगली नोकरी, उत्तम संधी आणि अधिक उत्पन्न मिळू शकते. परिणामी भविष्यात बचत आणि गुंतवणुकीसाठी अधिक पैसा उपलब्ध होऊ शकतो.
अधिक कमाई करणे ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची फक्त पहिली पायरी आहे. त्या कमाईचे योग्य नियोजन, नियमित बचत, शिस्तबद्ध खर्च आणि योग्य गुंतवणूक यामुळेच मजबूत आर्थिक भविष्य घडवता येते.
अस्वीकरण : या लेखातील माहिती व गुंतवणुकीसंदर्भातील मते ही फक्त माहितीपर उद्देशाने असून, कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.